ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. २ - केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६३ अंकांनी वाढून २४,२४२ अंकांवर तर, निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवून ७३६८ वर बंद झाला. दोन दिवसात बीएसई सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची वाढ झाली आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये ७७७ अंकांची वाढ झाली होती. गेल्या सात वर्षात एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ होती. मागच्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने कोसळत होता मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेअर बाजारात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्के राहील असा अंदाज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक तिमाही पतधोरण आढाव्याच्या नियोजित तारखे आधीच रेपो दरात ( बँका आरबीआयकडून ज्या दराने कर्ज घेतात तो दर) कपात करेल असा अंदाज असल्यामुळे शेअर बाजाराला तेजी दिसत आहे.
दोन दिवसात शेअर बाजारात १ हजार अंकांची उसळी
By admin | Published: March 02, 2016 4:21 PM