नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस व जनता दलाचे संयुक्त सरकार बनवण्यासाठीचा मसुदा तयार झाला असून, त्यांसंदर्भात भावी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते बुधवारी संध्याकाळी ४ वाजता बंगळुरूमध्ये होणाऱ्या शपथविधीला हजर राहणार आहेत.काँग्रेस नेत्यांशी कुमारस्वामी यांची जी चर्चा झाली, त्यात बहुजन समाज पक्षाच्या एकमेव आमदाराला मंत्रिमंडळात घेण्यावर निर्णय झाला. काँग्रेसने दोन उपमुख्यमंत्री असावेत, असा प्रस्ताव कुमारस्वामी यांच्यापुढे ठेवला आहे. तसेच काही महत्त्वाची खाती काँग्रेसला द्यावीत, असेही त्यांना सुचवण्यात आले आहे. त्यावर मंगळवारी अंतिम निर्णय होईल. राहुल यांची कुमारस्वामींनी भेट घेतली, तेव्हा खा. के. सी. वेणुगोपालही हजर होते.उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसने जी. परमेश्वर यांचे नाव नक्की केले आहे. त्याशिवाय भाजपापुढे अडचणी निर्माण करण्यात व काँग्रेस आमदारांना एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे डी. के. शिवकुमार यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचे स्थान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आता मंगळवारी बंगळुरूत होणाºया चर्चेत स्वत: एच. डी देवेगौडा तसेच काँग्रेसतर्फे के. सी. वेणुगोपाळ, सिद्धरामय्या व शिवकुमार सहभागी होतील. त्यात जो निर्णय होईल, तो राहुल गांधी यांना कळवून त्यांचा होकार घेतला जाईल. काँग्रेसला २0 ते २२ मंत्री असावेत, असाही प्रस्ताव आहे.दिग्गजांची उपस्थितीकुमारस्वामी यांनी नंतर मायावती यांचीही भेट घेतली. मायावतीही बुधवारी शपथविधीला येणार आहेत. कुमारस्वामी यांनी मार्क्सवादी तसेच भाकप नेत्यांनाही निमंत्रण दिले. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, तामिळ अभिनेते रजनीकांत, सीताराम येचुरी हेही नेते शपथविधीला हजर राहतील, असे सांगण्यात येते. बाकी सर्व विरोधी पक्षांचे बडे नेतेही येणार असल्याने शपथविधीला विरोधकांचे शक्तिप्रदर्शनच मानले जात आहे.
कर्नाटकात होणार दोन उपमुख्यमंत्री?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 01:53 IST