INDIGO Flight News: रांचीहूनदिल्लीकडे निघालेल्या एका इंडिगो विमानात अंगावर शहारे आणणारा प्रसंग घडला. एक दाम्पत्य आपल्या ६ महिन्याच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विमानाने प्रवास करत होते. अचानक बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऐनवेळी काय करावे सूचत नव्हते. अशातच क्रू मेंबरने विमानात याबाबत उद्घोषणा करत मदतीचे आवाहन केले. सुदैवाने विमानात डॉक्टर प्रवास करत होते. तत्काळ दोन डॉक्टरांनी मिळून चिमुकल्यावर प्राथमिक उपचार करत त्याला जीवनदान दिले. हे दोन डॉक्टर साक्षात देवदूत ठरले.
रांचीहूनदिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही वेळात ६ महिन्याच्या चिमुकल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत आहे, असे पालकांच्या निदर्शनास आले. बाळाची अवस्था केविलवाणी झाली होती. बाळाची ती केविलवाणी अवस्था पाहून आईला रडू कोसळले. विमानातील क्रू मेंबर्सनी याबाबत विमानात उद्घोषणा केली आणि कोणी डॉक्टर असल्यास तत्काळ मदतीसाठी यावे, अशी विनंती केली. आयएएस अधिकारी डॉ.नितीन कुलकर्णी आणि रांचीचे डॉ.मोजम्मिल फिरोज हेही या विमानातून प्रवास करत होते. डॉ. कुलकर्णी हे झारखंडच्या राज्यपालांचे प्रधान सचिव आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभवही आहे.
थरारक २० मिनिटे आणि चिमुकल्याचा वाचला जीव
डॉ. फिरोज आणि डॉ. कुलकर्णी बाळाचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावले. मुलाची आई रडत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. डॉ.मोजम्मिल यांनी बाळाला इंजेक्शन दिले. मुलाची काळजी घेतली आणि ऑक्सिजन मास्क लावत श्वास घेण्यास मदत केली. अन्य औषधे वापरुन ऑक्सिजनचा पुरवठा केला. काही उपचारांनंतर बाळाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. हृदयाची स्पंदने मोजण्यात आली. ऑक्सिमीटर नसल्याने ऑक्सिजनचे प्रमाण समजत नव्हते. सुरुवातीची १५ ते २० मिनिटे खूपच महत्वाची तणावाची होती. मात्र, काही वेळाने बाळाची स्थिर झाले. यासंदर्भात दोन्ही डॉक्टरांनी माहिती दिली. तसेच केबिन क्रु खूपच सहकार्य केल्याचे सांगितले.
दरम्यान, डॉ. नितीन कुलकर्णी यांनी एक तासानंतर विमान लँड झाल्यानंतरही बाळाला आपल्या देखरेखीत ऑक्सिजन सपोर्ट सुरु ठेवला. या मुलाला जन्मजात हृदयरोग असून, त्यावरील उपचारासाठी पालक चिमुकल्याला घेऊन दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेले जात होते. फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनीही दोन्ही डॉक्टरांचे आभार मानले आणि अभिनंदन केले. डॉक्टर हे देवाने पाठवलेले देवदूत आहेत, असे सांगितले. एका ६ महिन्यांच्या बाळाला फ्लाइटमध्ये नवे जीवन मिळाल्याचे आम्ही पाहिले, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.