Lion and dog Fight in Gujarat : जंगलातील हिंस्र प्राणी रहिवासी भागात शिरल्याच्या अनेक घटना घडतात. बिबट्या, वाघ, हत्ती, अस्वल...असे विविध प्राणी अनेकदा अन्न-पाण्याच्या शोधात रहिवासी भागात येतात. तुम्हीही अनेकदा अशा बातम्या ऐकल्या असतील. पण, तुम्ही कधी गावात सिंह शिरल्याची बातमी ऐकली आहे का? गुजरातमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात गावात शिरलेल्या दोन सिंहावर पाळीव कु्त्रे वरचढ ठरल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध असलेल्या गीर राष्ट्रीय उद्यानापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरेली येथील सावरकुंडला येथे ही घटना घडली. रविवारी(दि.11) मध्यरात्री दोन सिंह जंगलातून बाहेर आले आणि रहिवासी भागात फिरू लागले. यावेळी त्यांची नजर एका गोठ्यावर गेली, जिथे अनेक गाई बांधल्या होत्या. सिंहाने गोठ्यात जाण्याचा प्रयत्न कताच गोठ्याची राखण करणारे दोन कुत्रे आले अन् सिंहांना पाहून भुंकायला सुरुवात केली.
पाहा video :-
एका बाजूने सिंह डरकाळी फोडत होते, तर दुसरऱ्या बाजूला कुत्रेही सर्व शक्तीनिशी त्यांच्यावर भुंकत होते. सुदैवाने सिंह आणि कुत्र्यांमधे लोखंडाचे गेट होते, त्यामुळे कुत्र्यांचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. काही वेळानंतर सिंहांनी तेथून पळ काढला. तर, कुत्र्यांचा आवाज ऐकून वॉचमनने बाहेर येऊन पाहिले, पण तोपर्यंत सिंह पळून गेले होते. ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून नेटकरी कुत्र्यांच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.
सावरकुंडला येथे ही घटना उघडकीस आल्यानंतर वन अधिकारी अलर्ट झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते अन्न-पाण्याच्या शोधात सिंह रहिवासी भागात आले असावे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरेली आणि जुनागढ जिल्ह्यातील लोकवस्तीच्या भागात सिंह पहिल्यांदाच फिरताना दिसले आहेत. 2020 च्या जनगणनेनुसार गुजरातमध्ये 674 आशियाई सिंह आहेत.