फतेहगढ साहिब : घनिष्ठ मित्र असलेले दोन माजी आयएएस अधिकारी पंजाबमधील फतेहगढ साहिब या लोकसभा मतदारसंघामध्ये परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पंजाब केडरचे माजी आयएएस अधिकारी दरबारासिंग गुरू हे शिरोमणी अकाली दलातर्फे तर माजी आयएएस अधिकारी अमरसिंग हे काँग्रेसकडून या मतदारसंघात लढत देत आहेत.
अमरसिंग हे मध्य प्रदेश केडरचे माजी सनदी अधिकारी आहेत. फतेहगढ साहिबचे विद्यमान खासदार हरिंदर सिंह खालसा हे देखील माजी आयएफएस अधिकारी आहेत. पण ते यावेळी लढतीत नाहीत. या मतदारसंघातून खालसा आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते व मग त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी आपने बलजिंदरसिंह चौंडा यांना तिकिट दिले आहे.
दोघांच्या व्यावसायिक व राजकीय कारकिर्दीमध्ये काही साम्यस्थळे आहेत. दोघांनीही राजकारणात शिरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम पाहिले आहे. अमरसिंग यांनी मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजयसिंह तर दरबारासिंग गुरू यांनी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासोबत काम केले होते. बस्सी पठणा येथील विद्यमान आमदार गुरुप्रीत सिंह यांनाच फतेहगढ साहिब लोकसभा मतदारसंघातून पक्षातर्फे उमेदवारी देण्याचे घाटत होते. मात्र राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अमरसिंग यांनी बाजी मारली.एकही निवडणूक जिंकली नाहीया दोन्ही माजी आयएएस अधिकाऱ्यांनी आजवर एकही निवडणूक जिंकलेली नाही. दरबारासिंग गुरू याआधी भदौर व बस्सी पठणा येथून विधानसभा निवडणुकीत तर अमरसिंग हे रायकोट विधानसभा निवडणुकीत हरले होते. फतेहगढ साहिब मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दरबारासिंह गुरू व अमरसिंह यांनी परस्परांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दरबारासिंह गुरू हे पूर्वी मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांच्या कामासाठी जात तेव्हा अमरसिंह यांच्या घरीच भोजन घेत असत.