हायस्पीड ड्रायव्हिंगसह स्नॅपचॅटवर चॅटिंग; नदीत पडली कार, दोघांचा मृत्यू, तिसऱ्याने फोडली काच अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:33 IST2025-01-16T17:32:10+5:302025-01-16T17:33:08+5:30
भोपाळमधील कोलार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. वेगाने गाडी चालवताना स्नॅपचॅट वापरणं जीवावर बेतलं आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील कोलार भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. वेगाने गाडी चालवताना स्नॅपचॅट वापरणं जीवावर बेतलं आहे. रात्रीच्या वेळी एक भरधाव गाडी सुमारे ५० फूट खोल नदीत पडली, त्यात दोन मित्रांचा मृत्यू झाला. तर एक मित्र जखमी झाला आहे. कोलार सिक्स लेनवर ही घटना घडली.
कोलार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पलाश गायकवाड, २२ वर्षीय विनीत आणि २४ वर्षीय पीयूष गजभिये हे कारने फिरण्यासाठी बाहेर गेले होते. विनीत गाडी चालवत होता. जखमी पीयूषने सांगितलं की, "विनीत गाडी चालवताना स्नॅपचॅट वापरत होता."
"गाडी खूप वेगाने जात होती, पण नंतर कोलार सिक्स लेनवरील इनायतपूरजवळ केरवा नदीवरील पुलासमोर अचानक वळण आल्यामुळे विनितला गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि गाडी पुलावरून नदीत पडली. गाडी नदीत पडताच दरवाजे बंद झाले, ज्यामुळे विनीत आणि पलाश बाहेर पडू शकले नाहीत."
"पीयूषने गाडीची काच फोडली आणि बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुलावर येऊन लोकांना अपघाताची माहिती दिली." पोलिसांनी घटनास्थळ गाठून विनित आणि पलाश यांचे मृतदेह बाहेर काढले आणि हमीदिया रुग्णालयात पाठवले. या घटनेत जखमी झालेल्या पीयूषवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.