आग्रा: सोन्याचे दागिने आपण जीवापाड जपतो. एखादा सोन्याचा दागिना सापडत नसल्यास जीव कासावीस होतो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या आग्र्याता वास्तव्यास असलेल्या दोन बहिणींसोबत घडला. त्यांनी सोन्याचा दागिना चुकून कचऱ्यात टाकला. काही वेळातच ही बाब त्यांच्या लक्षात आली. दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना दागिन्याचा शोध सुरू केला.
फिरोजाबादच्या केटीकरी गावच्या रुची आणि अनुष्का यादव सध्या हवेली येथील घरात भाड्यानं राहतात. रुचीनं बीएड केलं आहे. तर अनुष्का बीएससीची विद्यार्थिनी आहे. मंगळवारी सकाळी रुचीनं तिची कर्ण आभूषण एका कागदाच्या पुडीत ठेवली. पुडी उशीखाली ठेऊन रुची कॉलेजला गेली.
रुची गेल्यानंतर अनुष्कानं खोलीची साफसफाई सुरू केली. कचऱ्यासोबत तिनं कर्ण आभूषण असलेली पुडीदेखील प्लास्टिकच्या पिशवीत टाकली. त्यानंतर कचरा गोळा करण्यासाठी पालिकेची गाडी आली. अनुष्कानं प्लास्टिकची पिशवी त्या गाडीत टाकली. कॉलेजमधून घरी परतल्यावर रुची तिचा दागिना शोधू लागली. कागदाच्या पुडीबद्दल तिनं अनुष्काकडे विचारणा केली. त्यावर आपण ती कचऱ्यासोबत टाकून दिल्याचं अनुष्कानं सांगितलं.
कचरा गाडीत टाकलेल्या पिशवीत सोन्याचे दागिने होते ही गोष्ट समजताच अनुष्काच्या पायाखालची जमीन सरकली. रुचीलादेखील धक्का बसला. दोघी बहिणी कचरा गाडी शोधण्यास निघाल्या. शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यांनी गाडी शोधून काढली. दोघांनी मिळून डंपिंग यार्डमधील ५० टन कचऱ्यात शोधाशोध केली. सहा तासांच्या मेहनतीनंतर अखेर त्यांना यश आलं. हरवलेला दागिना सापडला. त्यामुळे दोघींच्या चिंताग्रस्त चेहऱ्यांवर अखेर हसू फुललं.