गेल्या चार वर्षांपासून दिल्लीत दोन तरुणी एकत्र राहत होत्या. दोघींनीही ठरवलं होतं की, त्या कोणत्याही मुलाशी लग्न करणार नाहीत आणि पती-पत्नीसारखं एकत्र राहतील. पण आता यात ट्विस्ट आला आहे. यामधील एक तरुणी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्याशी लग्न करणार आहे. ती मैत्रिणीला सोडून यूपीतील बरेलीला देखील गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी ही दिल्लीतील सरिता विहारची रहिवासी आहे. तर दिशा ही बरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. रोशनी बरेलीला पोहोचली आणि एसएसपी ऑफिसमध्ये खूप रडू लागली. रोशनीने सांगितलं की, दिशा तिच्या आत्याची मुलगी आहे. ती दिल्लीत राहायला आली होती. गेल्या ४ वर्षांपासून दोघी एकत्र राहत होत्या. आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं पण आता दिशा दुसऱ्या मुलाशी लग्न करणार आहे.
४ वर्षांत घेतले ३ लाख
रोशनीने सांगितलं की, दिशाने तिच्या पालकांच्या उपचारांच्या नावाखाली ४ वर्षांत तिच्याकडून एकूण ३ लाख रुपये घेतले. मी पैसे मागितले तेव्हा तिने मला शिवीगाळ आणि मारहाण केली. ९ मार्च रोजी मी घरात नसताना दिशा माझे दोन मोबाईल फोन, दोन सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याचे कानातले आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रं घेऊन दिल्लीहून बरेलीला आली. २७ मार्च रोजी मी बरेलीला पोहोचली आणि दिशाकडून माझे पैसे मागितले तेव्हा तिने मला मारहाण केली आणि तेथून हाकलून लावलं.
दिशाला आवडतो दुसरा मुलगा
रोशनीचा आरोप आहे की, तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पण कोणतीही सुनावणी झाली नाही. तिने आरोप केला आहे की, आता दिशाला दुसरा मुलगा आवडतो आणि म्हणूनच ती तिच्यापासून दूर गेली आहे. रोशनीने एसएसपी कार्यालयात जाऊन या प्रकरणाची लेखी तक्रार केली आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.