उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये दोन मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. हे प्रेम इतकं वाढलं की, दोघींनी एकमेकींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एक मैत्रीण तब्बल ७ लाख रुपये खर्च करून मुलगा झाली आहे. हा विवाह परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्नौज जिल्ह्यातील सरायमीरा येथे राहणाऱ्या एका सराफा व्यावसायिकाच्या मुलीचं तिच्या मैत्रिणीसोबत २५ नोव्हेंबर रोजी लग्न झालं होतं. लग्न करण्यासाठी व्यावसायिकाची मुलगी मुलगा झाला. ज्यासाठी तिने ७ लाख रुपये खर्च केले. यानंतर तिने आपलं नावही बदललं.
२०२० मध्ये या दोघींची एका ज्वेलरी शॉपमध्ये भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. तेव्हाच दोघींची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात सतत भेटीगाठी होत राहिल्या. हळूहळू त्या दोघी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. त्यांच्या हट्टापुढे घरातील सदस्यही काही करू शकले नाहीत आणि दोघींच्या लग्नाला परवानगी दिली.
सराफा व्यावसायिकाच्या मुलीला लहानपणापासूनच मुलांसारखं राहण्याची आवड होती. सुरुवातीपासूनच ती मुलांचे कपडे घालायची. त्यांच्यासारखीच स्टाईलमध्ये फिरायची. २०२० मध्ये जेव्हा तिची ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मुलीशी भेट झाली तेव्हा ती मुलीच्या प्रेमात पडली. दोघींचाही एकमेकींवर जीव जडला. यानंतर दोघींनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.