नवी दिल्ली : कॅशलेस अर्थव्यवस्था आणि डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दोन लकी ड्रॉ योजनांची घोषणा केली आहे. ख्रिसमसचे औचित्य साधून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापार योजना जाहीर केली, तर तीन महिन्यांनंतर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंपर ड्रॉ असेल. या दिवशी कोट्यवधी रुपयांची बक्षिसे दिली जातील. आकाशवाणीवरील या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, ग्राहकांच्या प्रोत्साहनासाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डीजी धन व्यापार योजना आहे. पूर्ण देशात गाव असो की, शहर अथवा शिकलेले लोक असोत की, अशिक्षित या सर्वांमध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे कॅशलेस काय आहे? हा व्यवहार कसा चालतो? नगदीशिवाय खरेदी कशी केली जाऊ शकते. सगळीकडे एक उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकजण एकमेकांकडून काही शिकू इच्छित आहे. मोबाईल बँकिंगला बळ मिळण्यासाठी या प्रोत्साहन योजनेचा आज प्रारंभ होत आहे. मोदी म्हणाले की, २५ डिसेंबर रोजी आज ख्रिसमसच्या निमित्ताने १५ हजार नागरिकांना लकी ड्रॉचे प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आगामी शंभर दिवस ही योजना चालणार आहे. दररोज १५ हजार नागरिकांना बक्षिसे मिळतील.तीन हजारांपर्यंत खरेदी करणाऱ्यांसाठी योजनाही योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे. विशेषत: गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्ग यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली आहे. ५० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत खरेदी करणारांसाठी ही योजना आहे. गरिबातील गरीब लोक यूएसडीचा वापर करून साध्या मोबाईलच्या माध्यमातूनही व्यवहार करू शकतात. भारतात आज ३० कोटी रुपे कार्ड आहेत. यात २० कोटी गरीब कुटुंब जन-धन खाते असणारे आहेत. हे ३० कोटी लोक या योजनांचा भाग बनू शकतात. मोदी म्हणाले की, मला विश्वास आहे की, देशातील नागरिक या व्यवहारात रस दाखवतील. आपल्या आजूबाजूला असणारी तरुण मुले याबाबत माहितीही देऊ शकतील.
‘कॅशलेस’साठी केंद्र सरकारचे दोन लकी ड्रॉ
By admin | Published: December 26, 2016 12:59 AM