बेळगाव - टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. बुधवारी रात्री हा प्रकार घडला. खडक गल्लीत दोन गट एकमेकांसमोर आले आणि एकमेकांना भिडले. यावेळी हाणामारीसोबत झालेल्या दगडफेकीमुळे पोलीस आयुक्त व उपायुक्त जखमी झाले आहेत. दगडफेकीत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या गटांमध्ये तरुणांचा मोठा समावेश होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला, त्यानंतर पुन्हा जमाव भडकला आणि जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत पोलीस आयुक्त व उपायुक्त जखमी झाले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
सुरुवातील खडक गल्ली, जालगार गल्ली आणि घी गल्ली परिसरात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीला सुरुवात झाली होती. मात्र नंतर हे लोण चव्हाट गल्ली, भडकल गल्लीसह शहरातील काही भागात पसरले. त्यातच काही ठिकाणी वीज गेल्याने आणखी गोंधळ उडाला होता. सध्या बेळगावात कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. त्यातच ही घटना घडल्याने पोलिसांची धावपळ झाली. जमावाने अनेक गाड्यांची जाळपोळ केली असून या घटनेत काही जण जखमी असल्याचेही सांगण्यात येते.
रात्री उशिरा येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आली असून सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने बेळगावकरांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.
सुरक्षेसाठी पोलिसांच्या आठ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान या घटनेमागे नेमकी टिपू सुलतान जयंती कारणीभूत आहे की अन्य कोणतं कारण आहे याचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी संपुर्ण घटनेचं चित्रीकरण केलं असून, लवकरच समाजकंटकांना अटक करु असा विश्वास व्यक्त केला आहे. तपास करण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.