शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावरून भारताच्या भूमिकेवर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसते. मी मांडलेली भूमिका ही अधिकृत असल्याचे पक्षाचे परराष्ट्र व्यवहार शाखेचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी म्हटले. रविवारी शर्मा यांनी ज्या रितीने पक्षाची भूमिका मांडली त्यावर खासदार शशी थरूर बरेच नाराज आहेत.
थरूर म्हणतात की, “सयुंक्त राष्ट्रांत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य नव्हती. भारताच्या भूमिकेला लोक चुकीच्या विचाराने उचललेले पाऊल म्हणतात. भारताने स्वत:ला चुकीच्या बाजुने ठेवले, असे म्हणता येईल.” थरूर यांच्या या भाष्याशी आनंद शर्मा सहमत नाहीत. शर्मा यांनी स्पष्ट केले की, “मी जे निवेदन जारी केले ती अधिकृत प्रतिक्रिया असून ते त्यांचे विचार असू शकतात.” थरूर यांचे भाष्य व्यक्तिगत असल्याचे सांगून आनंद शर्मा यांनी ते मुळातच खोडून टाकले.
उल्लेखनीय हे आहे की, आनंद शर्मा यांनी तीच भूमिका घेतली जी सरकारची आहे. सरकार म्हणते, शांतता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे. चर्चेच्या माध्यमातून या संकटावर तोडगा काढला पाहिजे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सगळे नेते भारतीय विद्यार्थ्यांना तेथून आणण्याबाबत सतत सरकारवर हल्ला करीत आहेत. परंतू, थरूर यांच्यासह पक्षातील अनेक नेते असे मानतात की, भारताने कठोर शब्दांत सयुंक्त राष्ट्रांत भूमिका स्पष्ट करायला हवी.