श्रीनगर/ जम्मू : राजौरीच्या बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापीठात (बीजीएसबी) सोमवारी विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीत आठ विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही गटांनी दगडफेक केली आणि चार वाहने पेटवून दिल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी लगेच विद्यापीठात धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.काही मुद्यांवरून काश्मीर खोऱ्यातील विद्यार्थी आणि स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष उद्भवल्याचे राजौरीचे उपपोलीस महानिरीक्षक जॉनी विल्यम्स यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. विद्यापीठ प्रशासनाने मात्र हा वाद निकाली निघेल अशी आशा व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग म्हणाले, काश्मीर खोऱ्यात अलीकडे उफाळलेल्या हिंसाचारामागे निश्चितच कट असून कुपवाडा आणि हंडवारातील शांतता बिघडवण्याचा डाव आहे. काश्मीर खोऱ्यात अन्यत्र हिंसक कारवाया होत असतानाही हा भाग शांत राहिलेला होता. देशविरोधी आणि जनताविरोधी घटकांना अफवा पसरविण्यात यश आल्यामुळेच ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली.सोमवारी सकाळी काही तासांसाठी शिथिल करण्यात आलेले संचारबंदीसारखे निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा पुन्हा बहाल करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या दोन जिल्ह्णांतील घटनांसाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देतानाच युवकांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. अन्यायासाठी जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा ठोठावली जाईल, असे त्या जम्मू येथे एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर म्हणाल्या.रविवारी स्थिती शांत राहिली मात्र सोमवारी हंडवारा, क्रालगुंड आणि त्रेहगाम भागात पुन्हा हिंसक आंदोलन झाल्यामुळे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हंडवारा शहरात सुमारे दीडशे युवकांनी दगडफेक केली.
काश्मिरात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी; आठ जखमी
By admin | Published: April 19, 2016 4:27 AM