हैदराबाद - हैदराबादमधील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणीन्यायालयाने निकाल दिला आहे. याप्रकरणी आरोपी अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी यांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर याप्रकरणातील इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अद्याप कोर्टाने निकाल राखून ठेवला असून दोषींच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. मात्र, याप्रकरणात दोघांना दोषी ठरविल्यामुळे या हल्ल्यातील पीडितांना तब्बल 11 वर्षांनी न्याय मिळाला आहे.
हैदराबाद येथे 2007 साली दोन साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटात 42 नागरिकांचा जीव गेला होता, तर 50 पेक्षा जास्त जखमी झाले होते. हैदराबादच्या मध्यवर्ती कोटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध गोकुळ चाट येथे पहिला स्फोट घडविण्यात आला होता. तर येथील पर्यटनस्थळ असलेल्या ल्युंबिनी पार्क येथे दुसरा स्फोट घडवून आणला होता. तर स्फोटानंतर पोलिसांनी जिवंत स्फोटकेही हस्तगत केली होती. तब्बल 11 वर्षानंतर या स्फोटातील पीडितांना आज न्याय मिळाला आहे. याप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. त्यामध्ये दोघांना दोषी ठरविण्यात आले आहे. तर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच दोषी ठरविण्यात आलेल्या दोघांच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. शफीक सईद आणि इस्माईल चौधरी असे दोषी ठरविण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे दोघे या स्फोटाचे मास्टरमाईंड होते. अद्यापही हे दोघे फरारच आहेत.