श्रीनगर - एकीकडे देशात कोरोना विषाणूचे थैमान सुरू असताना दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील रामपूर सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.
शुक्रवारी पाकिस्तानने बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर विभागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबारास सुरुवात केली होती. दरम्यान, भारतीय लष्कराकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र यावेळी पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात चार जवान जखमी झाले. यापैकी दोन जवानांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या सैनिकांची ओळख पटली असून, यापैकी एका जवानाचे नाव हवालदार गोकर्ण सिंह तर दुसऱ्या जवानाचे नाव नायक शंकर एस.पी. आहे. तर हवालदार नारायण सिंह आणि नायक प्रदीप भट्ट यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले की, शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने अकारण गोळीबारास सुरुवात केली. यादरम्यान काही जवान जखमी झाले.
यापूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले होते. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.