मुकुंद बाविस्कर, नाशिकअखिल ख्रिस्त धर्माला आनंददायक वाटणारी आणि समस्त भारतीयांसाठी भूषणावह ठरणारी घटना पावन रविवारी पवित्र रोम शहरात घडली. ही ऐतिहासिक घटना म्हणजे केरळ प्रांतातील दोन भारतीय ख्रिस्त धर्मगुरुंना ‘संत’पदाचा बहुमान देण्यात आला. या शिवाय इटलीतील अन्य तीन धर्मगुरुंनाही हा सन्मान प्राप्त झाला आहे.पवित्र व्हॅटीकन सिटीमध्ये आज ख्रिस्तराज सणाच्या दिवशी पोप फ्रान्सिस यांनी जगातील पाच धर्मगुरुंना ख्रिस्ती धर्मातील सर्वोच्च समजला जाणारा ‘संत’ पदाचा बहुमान प्रदान केला. यात दोन भारतीय आणि तीन इटलीतील धर्मगुरुंचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच वर्षी २७ एप्रिल रोजी पोप तेविसावे जॉन, तसेच पोप द्वितीय जॉन पॉल यांना संतपद बहाल करण्यात आले होते. एकच वर्षात दोन वेळा संतपद प्रदान सोहळा होण्याचा योग अत्यंत दुर्लभ मानला जातो. केरळ प्रांतातील सीरियो-मलबार चर्चचे धर्मगुरू कुरुयाकोसे एलियास चावरा, मेरी इम्यॅक्युलेटरचे संस्थापक होते. त्यांचे निर्वाण १८७१ साली झाले. त्यांची संतपदाची प्रक्रिया १९८४ मध्ये सुरू झाली. निर्वाणानंतर १४३ वर्षांनी हा बहुमान प्राप्त होत असल्याने केरळसह संपूर्ण भारतीय ख्रिस्ती जगतात आनंद व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे संतपद मिळालेल्या दुसऱ्या धर्मगुरू सिस्टर युफरासिया यादेखील केरळ प्रांतातीलच असून, निर्वाणापर्यंत म्हणजे १९५२ पर्यंत त्यांनी अखंड समाजसेवा केली. १९८७ मध्ये त्यांना देवाचा सेवक घोषित करण्यात आले. आणि मृत्यूपश्चात ६२ वर्षांनी त्यांना संतपदाचा बहुमान प्राप्त होत आहे. या दोन्ही धर्मगुरुंना संतपद मिळाल्याबद्दल, त्रिसूर, तिरुअनंतपुरम, पणजी, कोलकाता, नवी दिल्ली, वसई आदि मोठ्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.व्हॅटीकन सिटीमधील सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये होणाऱ्या विशेष प्रार्थनेच्या वेळी चावरा आणि युफरासिया यांना सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी ‘संतपदा’चा बहुमान प्रदान केल्याची घोषणा केली तेव्हा उपस्थित लाखो ख्रिस्त बांधवांनी एकच जल्लोष केला.या विशेष सोहळ्यासाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून कार्डिनल, धर्मगुरू आणि नन असे शेकडो लोक उपस्थित होते. तद्वतच भारत सरकारच्या वतीने राज्यसभेचे माजी उपसभापती पी.जे.कुरियन यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळही उपस्थित होते. दरम्यान, याच सोहळ्यात इटलीतील धर्मगुरू जिवोव्हान्नी अँटोनियो फरिना, लुडोविको डी कासोरिया आणि अमातो रॉकोनी यांनाही संतपदाचा सन्मान बहाल करण्यात आला. असे वसई (मुंबई) प्रांताचे फादर फ्रान्सिस कोरिया यांनी सांगितले.
दोन भारतीयांना मिळाला ‘संत’पदाचा बहुमान
By admin | Published: November 24, 2014 1:56 AM