ऑनलाइन लोकमत
कुवेत, दि. २८ - कुवेतमधील मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय दूतावासातर्फे सांगण्यात येत आहे.
शुक्रवारी (२६ जून) कुवेतमधील मशिदीत मुस्लिम मागरिक नमाज अदा करत असतानाच बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता, त्यात २६ नागरिक ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय दूतावासातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये रिझवान हुसैन (३१) व इब्ने अब्बास (२५) या दोन भारतीयांचा समावेश आहे. हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशमधील रहिवासी होते, हुसैन हा वॉचमन म्हणून तर अब्बास हा ड्रायव्हर म्हणून काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे.