रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलावर (बीएसएफ) नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद, तर चार जखमी झाले.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या बांदे पोलीस स्टेशनअंतर्गत बेचा गावातील जंगलात नक्षलवाद्यांनी शनिवारी पहाटे बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. त्यात १२२ व्या बटालियनचे जवान विजयकुमार आणि राकेश नेहरा शहीद, तर अन्य चार जवान जखमी झाले. जवानांचे हे पथक पंखाजूर क्षेत्रातील छोटेबेटिया छावणीतून नक्षलविरोधी मोहिमेवर रवाना झाले होते. हे पथक बेचा गावातील जंगल आणि नदीजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. सुमारे एक तास चकमकीनंतर नक्षलवादी पळून गेले. दरम्यान, चकमकीची माहिती मिळताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमी जवानांना बाहेर काढून हेलिकॉप्टरने रायपूरला पाठविण्यात आले. दुसरीकडे बस्तर क्षेत्रातील नक्षलवाद्यांनी बनावट चकमकीत लोकांना ठार मारण्यात येत असून खोटे आत्मसमर्पण करवून घेतले जात असल्याचा आरोप केला आहे. सोबतच या विरोधात बंदचे आवाहनही केले आहे. (वृत्तसंस्था)
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद
By admin | Published: March 13, 2016 4:30 AM