बांदीपोरा - जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण आपले दोन जवानही शहीद झाले. चकमक संपलेली नसून, ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही दहशतवादी इथे लपले असण्याची शक्यता आहे. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे असल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा सोमवारी भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.
राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'. यावेळी राजनाथ सिंह यांनी डोकलाम मुद्द्यावरही भाष्य केलं. 'भारत आता अजिबात दुबळा देश नाही, एक मजबूत देश झाला आहे. चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता', असं राजनाथ सिंह बोलले होते.