बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड : लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात गुरुवारी झालेल्या बाॅम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले आहेत. न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये हा स्फोट झाला. एका व्यक्तीचा मृतदेह बाथरूममध्ये मिळाला आहे. हा मृतदेह आत्मघाती हल्लेखोराचाच असावा, असे बोलले जाते.
न्यायालयात घडलेली ही घटना पाहणारे गुरपाल सिंह यांनी सांगितले की, चार गंभीर जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर न्यायालयात एकच पळापळ झाली. स्फोटाने न्यायालयाची इमारत हादरली. खिडक्यांची तावदाने फुटली आणि वाहनतळातील वाहनांचेही नुकसान झाले. वकिलांच्या संपामुळे गुरुवारी न्यायालयात गर्दी कमी होती.
पोलिसांनी बॉम्बस्फोटाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंजाब पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब निष्क्रिय करणारे पथक प्रकरणाची चौकशी करत आहेत. जर या स्फोटात काही अतिरेकी कारस्थान दिसून आले, तर एनआयए तपासाचे काम आपल्या हातात घेईल. पोलिसांनी न्यायालय परिसराला चारही बाजूंनी घेरले आहे आणि हाय अलर्ट घोषित केला आहे. शहराची नाकाबंदी केली आहे. लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी म्हटले आहे की, न्यायालय परिसरातील स्थिती पूर्ण नियंत्रणात आहे.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, ही अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल म्हणाले की, पंजाब पोलिसांचे सर्व लक्ष कायदा - व्यवस्थेतून हटवून राजकीय बदल्यांच्या कारवाईत लावण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले...
- बॉम्बस्फोटानंतर मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी म्हटले आहे की, विधानसभा निवडणूक जवळ आलेली पाहून पंजाबविरोधी शक्ती वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- अगोदर विटंबना करून आणि आता स्फोट करून पंजाबमध्ये वातावरण बिघडवू पाहत आहेत. मात्र, यातील दोषींना आम्ही सोडणार नाही.