कळपातील सहकाऱ्यांच्या मृत्युमुळे हत्ती खवळले? तीन हत्तींच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, बांधवगडजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:46 AM2024-11-04T05:46:38+5:302024-11-04T06:45:35+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ शनिवारी तीन हत्तींच्या हल्ल्यात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. अलीकडेच १० हत्तींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. हल्लेखोर हत्ती याच कळपातील असल्याचा कयास आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ शनिवारी तीन हत्तींच्या हल्ल्यात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. अलीकडेच १० हत्तींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. हल्लेखोर हत्ती याच कळपातील असल्याचा कयास आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरा गावात रामरतन यादव (५०) यांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर हत्तींनी ब्रहे गावात भैरव कोल (३५) याला चिरडले. तर बंका गावात मालू साहू (३२) याला जखमी केले. २९ ऑक्टोबरला बांधवगडच्या खितोली क्षेत्रात चार हत्ती मृतावस्थेत सापडले होते, त्यानंतर ३० ऑक्टोबरला चार हत्ती आणि ३१ ऑक्टोबरला दोन हत्तींचा मृत्यू झाला. या हत्तींचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. दोघांचा बळी घेणारे हत्ती याच कळपातील असल्याचे सिद्ध करण्यासाठी ट्रॅकिंगद्वारे अधिक तपशील गोळा केला जात आहे.
दरम्यान, हत्तींपैकी एका टस्करने मृत हत्तींना पुरले त्या जागेवर येऊन शोक व्यक्त केला. हत्ती शोक व्यक्त करताना मोठ्या आवाजात गर्जना करत होते, पाय आपटत होते, आणि कान हलवत होते. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित वनविभागाचे कर्मचारीही हादरले.
हत्तीच्या शरीरात आढळले विषाचे अंश
हत्तींच्या पोस्टमार्टेम अहवालात विषारी पदार्थांचे अंश आणि कोडो मिलेटचे मोठ्या प्रमाणात अंश आढळले. तपासासाठी नमुने ICAR-इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इझतनगर (उत्तर प्रदेश) आणि मध्य प्रदेशच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.