याला म्हणतात नशीब! खाणीत सापडले मौल्यवान हिरे अन् क्षणातच मजूर झाले मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:28 PM2020-11-04T12:28:52+5:302020-11-04T12:31:56+5:30
Diamonds News : हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.
कोणाचं नशीब हे कधी आणि कसं फळफळेल हे सांगता येत नाही. रातोरात लखपती झाल्याच्या अनेक घटना या समोर येत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये घडली आहे. दोन मजुरांचं नशीब फळफळलं आहे. हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. दिलीप मिस्त्री यांना कृष्णा कल्याणपूर भागातील जुरापूर खाणीतून 7.44 कॅरेटचा हिरा मिळाला आहे तर लखन यादव यांना 14.98 कॅरेटचा एक हिरा मिळाल्याची माहिती मिळत आहे.
पन्ना जिल्ह्यातील हिरा निरीक्षक अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मजुरांनी कार्यालयात दोन हिरे जमा केले आहे. हिऱ्याची योग्य किंमत अधिकाऱ्यांकडून ठरविली जाईल. एका अंदाजानुसार 7.44 कॅरेटचा हिरा सुमारे 30 लाख रुपये असू शकतो तर 14.98 कॅरेटचा हिरा त्यापेक्षा दुप्पट असू शकतो. या दोन्ही हिऱ्यांचा लिलाव होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यानंतर 12.5 टक्के रॉयल्टी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम या दोन कामगारांना देण्यात येईल.
"देवाच्या कृपेने मला पहिल्यांदा हा दर्जेदार आणि मौल्यवान हिरा मिळाला"
"आम्ही आनंदी आहोत. मी एक छोटा शेतकरी आहे आणि माझ्याकडे दोन एकर जमीन आहे. पहिल्यांदाच मला हिरा मिळाला. मिळालेल्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे" अशी माहिती लखन यादव यांनी दिली. तर आम्ही गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत करत आहोत. देवाच्या कृपेने मला पहिल्यांदा हा दर्जेदार आणि मौल्यवान हिरा मिळाला आहे" असं दिलीप मिस्त्री यांनी म्हटलं आहे.
पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी केला गेलेला लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांचे हाल झाले. हाताला काम नसल्यानं अनेक मजुरांनी गावची वाट धरली. मात्र मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातल्या रानीपूरमधील खाणीत काम करणाऱ्या नऊ मजुरांचं याआधी काही महिन्यांपूर्वी नशीब चमकलं होतं. त्यांना 10 कॅरेट 69 सेंटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत 50 लाख इतकी होती. काही दिवसांपूर्वी याच खाणीत एका मजुराला 70 सेंटचा हिरा सापडला होता. हे दोन्ही हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत.