संभल (उत्तर प्रदेश) : संभल जिल्ह्यातील मुस्लीम पंचायतीने तीन वेळा ‘तलाक’ म्हणत पत्नीला घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच पत्नीला ६० हजार रुपयांची मेहेरही देण्यास सांगितले. सदिरनपूर येथील २२ वर्षीय तरुणीचा मुसापूर गावातील ४५ वर्षांच्या व्यक्तीशी दहा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पतीने रागाच्या भरात एकदाच तलाकचा तीन वेळा उच्चार करून पत्नीला माहेरी निघून जाण्याचे फर्मान सोडले. नववधूच्या कुटुंबीयांनी तुर्क पंचायतीकडे धाव घेऊन न्यायाची मागणी केली. पंचायतीने एका वेळी तलाकचे तीनदा उच्चारण करण्यास गंभीर बाब मानून, घटस्फोट देणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. या व्यक्तीने दंडाची रक्कम अदा केली. मेहेर म्हणून दिलेले ६० हजार रुपये तसेच हुंड्यात दिलेला सोफा, पलंग, दुचाकी आणि भांडीकुंडी आदी साहित्य मुलीला परत मिळवून दिले, असे पंचायतीचे समन्वयक शाहीद हुसैन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)तुर्क समाजात बंदीतुर्क समुदायाने तलाक हा शब्द लागोपाठ तीन वेळा उच्चारण्यास बंदी घातली आहे. तीन तलाकचे हे पहिलेच प्रकरण असून, कडक संदेश जावा म्हणून पंचायतीने मोठा दंड ठोठावला. तुर्क समुदायाच्या लोकांनी हुंड्याची प्रथा, विवाहात उधळपट्टी, लग्न सोहळ्यात डीजे लावणे किंवा नृत्य पथक बोलावण्यासही पंचायतीने बंदी घातलेली आहे.
तीन तलाकबद्दल दोन लाखांचा दंड
By admin | Published: June 13, 2017 1:51 AM