कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभूत करून सत्ता मिळवण्याचे प्रयत्न भाजप करीत असला, तरी तिथे अनेक मतदारसंघांत पक्षाला उमेदवारच मिळालेेले नाहीत. काही ठिकाणी तृणमूलमधून आलेल्यांना लगेच उमेदवारी दिल्याने भाजप नेते व कार्यकर्ते संतप्त आहेत, तर दोन राजकीय नेत्यांनी भाजपची उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते सोमेन मित्रा यांच्या पत्नी शिखा यांना भाजपने कोलकात्यातील चौरंगी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आपले नाव भाजपच्या यादीत पाहून त्यांना धक्काच बसल्या. त्या म्हणाल्या की, माझा भाजपचा अजिबात संबंध नाही. मी भाजपतर्फे निवडणूक लढवणारही नाही. तसे सांगायला त्या पक्षाकडे जाणारही नाही. त्यांनीच नाव यादीत घातले, ते त्यांनीच काढावे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने आमदार माला साहा यांच्याऐवजी कोलकात्याच्या उपमहापौरांना उमेदवारी दिली. त्याबद्दल साहा यांची काहीच तक्रार नव्हती. पण त्या पक्षात नाराज असल्याचे गृहित धरून भाजपने त्यांचे पती तरुण साह यांच्या नावाची घोषणा केली. हे कळताच ते संतापले. ते म्हणाले की, सदस्य नसून भाजपने मला का उमेदवारी दिली, हे त्या पक्षाच्या नेत्यांना विचारा. मी तृणमूलच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे आणि करत राहीन. भाजपकडे राज्यात उमेदवार नाहीत, हे स्पष्ट आहे.
गेल्या वर्षभरात तृणमूल, डावे व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी देतानाही त्यांचाच अधिक विचार झाला. त्यामुळे भाजपचे निष्ठावंत व संघ परिवारातील लोक नाराज आहेत. काही ठिकाणी भाजपचे कार्यकर्तेच उपाध्यक्ष खा. मुकुल रॉय, खा. अर्जुन सिंह, पक्ष सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या अंगावर धावून गेले, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा राग पाहून बड्या नेत्यांना पळ काढावा लागल्याचे वृत्त आहे.