गुरगाव, दि. 11- गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या मुलांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई झाली आहे. हरियाणा पोलिसांनी रविवारी रात्री शाळेच्या व्यवस्थापकीय विभागातून दोन जणांना अटक केल्याचं समजतं आहे. फ्रांसिस थॉमस आणि जेइथ अशी दोघांची नाव आहेत. जेइथ हा शाळेमध्ये कोऑर्डिनेटरचं काम करत होता. तर दुसरीकडे प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.
रायन इंटरनॅशनलमध्ये झालेल्या या घटनेमुळे पालकांचा रोष दिवसेंदिवस वाढतो आहे. शाळेच्या बाहेर पालकांकडून जोरदार निदर्शनं केली जात आहेत. रायन इंटरनॅशनल स्कूलच्या गुरुग्राममधल्या सर्व चार शाळांना आज शिक्षणमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. भोंडसीच्या या रायन शाळेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हत्येनंतर भोंडसी येथील या रायन इंटरनॅशनल शाळेच्या प्रशासनाने शाळेचं संकेतस्थळही बंद केलं आहे. संतप्त पालकांनी रविवारी शाळेसमोर निदर्शनं केली होती.
मुलाच्या हत्येला दोन दिवस झाले पण अजूनही खरं काय आहे ते समोर आलं नाही. हत्या का झाली यामागील सत्य समोर यावं, हीच माझी इच्छा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासातून काही गोष्टी सुटल्या आहेत. म्हणूनच या घटनेची सीबीआय चौकशी व्हायला हवी. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासावर मी समाधानी नसून मुलाच्या हत्येप्रकरणाचा सविस्तर तपास हवा आहे. स्थानिक पोलीस करत असलेल्या तपासात अनेक त्रुटी आहे. म्हणूनच सीबीआयने तपास करायला हवा, असं प्रद्युम्नच्या वडिलांनी म्हंटलं आहे.
प्रद्युम्नच्या आईचा आत्महत्येचा इशारारायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये हत्या झालेल्या प्रद्युम्न ठाकूरच्या आईने आत्महत्येचा इशारा दिला आहे. प्रद्युम्नच्या खऱ्या मारेकऱ्यांना पकडलं नाही, तर आत्महत्या करेन, असा इशारा प्राम्नच्या आईने दिला आहे. तर प्रद्युम्नचे वडील या प्रकरणाची दाद सुप्रीम कोर्टात मागणार आहेत.
शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी प्रद्युम्नचा मृतदेह शाळेच्या शौचालयात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला होता. या प्रकरणी शाळेच्या बस कंडक्टर अटक करण्यात आली आहे. पण या हत्येमागे कंडक्टर नसावा, कोणी अन्य यामागे आहे, असा आरोप प्रद्युम्नच्या आईने केला आहे. पोलीस कोणाला तरी वाचवण्यासा प्रयत्न करत आहेत. खरा आरोपी पकडला न गेल्यास आत्मदहनाचा इशारा प्रद्युम्नच्या आईने दिला आहे. आरोपी बसवाहक अशोक असं कृत्य करूच शकत नाही, अशी माहिती चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. त्याच्याकडे चाकूही नव्हता, असं चालकाचं म्हणणं आहे.