रावत यांच्या चॉपरच्या अपघाताचा व्हिडीओ नेमका आला कुठून? अखेर उत्तर मिळालं
मुंबई: तमिळनाडूत बुधवारी चीफ ऑफ आर्मी स्टाफ बिपीन रावत यांच्या चॉपरला अपघात झाला. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण आहेत. भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि सैन्याच्या ११ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह या अपघातातून बचावले. त्यांच्यावर बंगळुरुतील कमांड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवारी दुपारी रावत यांच्या चॉपरला अपघात झाला. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अपघात होण्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला. जो पॉल नावाच्या एका व्यक्तीनं हा व्हिडीओ चित्रित केला. नासिर नावाची एक व्यक्ती त्यांच्या कुटुंबासोबत फिरायला गेली होती. नासिर यांनी या व्हिडीओबद्दलची माहिती एका वृत्त संकेतस्थळाला दिली.
'मी कुटुंबासोबत तमिळनाडूत कुटुंबासोबत सुट्टी घालवायला गेलो होतो. माझ्यासोबत माझा मित्र जो पॉलदेखील होते. जो फोटो काढत होते. कटेरी येथे रेल्वे रुळांजवळ फोटो काढत असताना आम्हाला एक चॉपर जवळ येताना दिसलं. त्यावेळी आम्ही त्याचा व्हिडीओ काढला,' असं नासिर यांनी सांगितलं.
नासिर यांनी ज्या चॉपरचा व्हिडीओ शूट केला, त्यामधूनच सीडीएस रावत प्रवास करत होते. काही सेकंदांमध्येच चॉपर गायब झालं. त्यानंतर मोठा आवाज ऐकू आला. त्यानंतर नासिर कुटुंबासह ऊटीला निघून गेले. तिथे त्यांना हेलिकॉप्टर अपघाताची आणि त्यांत रावत यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यानंतर नासिर यांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यांना व्हिडीओ पाठवला.