श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादी संघटनांविरोधात सुरक्षा दलांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी काश्मीरच्या बांदीपोरा भागात संयुक्त शोध मोहीम राबवली, या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू असताना सैनिकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत याची पडताळणी केली जात आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, उत्तर काश्मीरमधील बांदीपोराच्या वातनिरा भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला तेव्हा चकमक सुरू झाली, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, ज्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. चकमकीच्या शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी टीआरएफशी संबंधित एका दहशतवाद्याला जम्मू रेल्वे स्टेशनजवळून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.