राजेश निस्ताने, यवतमाळविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्'ातील दोन मंत्री, विधानसभा उपाध्यक्षांसह पाच आमदार आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. युती प्रमाणेच आघाडीतही मतविभाजन अटळ आहे. त्यातच गटा-तटाचे राजकारण आणि रुसव्या फुगव्यांचा धोका आहे. राष्ट्रवादीचे नेते अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार, आमदार संदीप बाजोरिया, आमदार संजय राठोड, आमदार विजय खडसे स्वत: विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे. यवतमाळच्या विद्यमान महिला आमदार नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे उपरोक्त मंत्री व आमदारांसोबतच प्रदेशाध्यक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गडकरींच्या मर्जीमुळे तिकीटयवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी मुलाला आखाड्यात उतरविले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना राज्यभर फिरण्याऐवजी माणिकराव यवतमाळात तळ ठोकून आहेत. यावरून त्यांची केविलवाणी अवस्था लक्षात येते. त्यांचा मुलगा राहुल याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी आमदार संदीप बाजोरिया, भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, शिवसेनेचे लोकांसोबत नि:स्वार्थपणे राहणारे तळमळीचे सामान्य कार्यकर्ते संतोष ढवळे यांचे तगडे आव्हान आहे. त्यातच नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापल्याने त्यांचा संपूर्ण गट राहुल ठाकरेंवर नाराज आहे. त्याचा फटका त्यांना बसणार आहे. राज्यात प्रचाराचा सर्वात पहिला नारळ राष्ट्रवादीचे नेते संदीप बाजोरिया यांनी फोडला आहे. खूप आधीपासून प्रचार सुरू झाल्याने बाजोरियांची आता तिसरी-चौथी फेरी सुरू आहे. यवतमाळ नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली सत्ता बाजोरियांसाठी जमेची बाजू ठरली आहे. यवतमाळ मतदारसंघाची भाजपाची उमेदवारी जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब गाडे पाटील यांनाच निश्चित झाली होती. परंतु राज्य पातळीवरील अंतर्गत राजकारण आणि नितीन गडकरींचे निकटवर्तीय असल्याने मदन येरावार यांना अखेरच्या क्षणी संधी देण्यात आली. येरावार अनुभवी आहेत, त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात बरीच विकास कामेही केली आहेत. त्यामुळेच मतदारांमध्ये त्यांच्या प्रति तेवढा रोष दिसत नाही. मात्र पक्षांतर्गत नाराजी मोडून काढण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. मदन येरावार यांच्यासाठी माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, गाडे पाटील यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. काँग्रेसची बालेकिल्ल्यातच कोंडीतिकडे वणीमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांच्यापुढे आपल्या पाटण या बालेकिल्ल्यातूनच भाजपाने आव्हान उभे केले आहे. भाजपा वामनरावांच्या हक्काच्या मतांमध्ये वाटा मिळविणार एवढे निश्चित. शिवाय मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामार्फत होणारे मतविभाजन वेगळेच आहे. प्रचारात राज ठाकरेंच्या सभेमुळे मनसेचे राजू उंबरकर प्लस ठरले आहे. उमरखेडमध्ये विद्यमान आमदार विजय खडसे यांच्यासोबतच त्यांचे रिमोट आमच्या हातात आहे, असे जाहीररीत्या सांगणाऱ्या नेत्यांच्या राजकीय इभ्रतीचा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या मतांमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार विभाजन करणार एवढे निश्चित.
दोन मंत्री, पाच आमदारांची कसोटी
By admin | Published: October 07, 2014 5:17 AM