ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - जम्मू व काश्मिरमध्ये बीफ विक्रीस बंदी घालण्याच्या जम्मू व काश्मिर हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने दोन महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. जम्मू व काश्मिर राज्याच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, गोवंशाची हत्या व विक्री करण्यासंदर्भात याविषयी काय तत्वे आहेत याचा अभ्यास करण्यासाठी जम्मू व काश्मिर उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय खंडपीठाची नियुक्ती करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जम्मू व श्रीनगरच्या खंडपीठांनी परस्परविरोधी निकाल दिल्याचे निदर्शनास आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या बीफ बंदीच्या आदेशाची अमलबजावणी दोन महिन्यांसाठी स्थगित केली आहे. जम्मू खंडपीठाने बीफ विक्रीस बंदी घालणारा आदेश पोलीस प्रशासनाला दिला तर श्रीनगर खंडपीठाने या तरतुदीच्या कायदेशीरतेसमोरच आव्हान उभे केले. आता दोन महिने तरी जम्मू व काश्मिर राज्यात बीफ खाण्यास कायदेशीर अडचण नसून त्यानंतरची स्थिती नियुक्त खंडपीठीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.