नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. याच दरम्यान निपाह व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. केरळमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं चिंता वाढवलेली असताना आता निपाह व्हायरसची देखील त्यात भर पडली आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये एका 12 वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. निपाह व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं दिसून आल्यानंतर स्थानिक रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं. मुलाच्या मृत्यूनंतर आता आणखी दोन लोकांमध्ये निपाहची लक्षणे दिसायला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे.
निपाहमुळे मृत्यू झालेल्या मुलाच्या संपर्कात आलेल्या एकूण 20 जणांपैकीच हे दोघे आहेत. या दोघांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुलाच्या घराच्या परिसरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या मुलाच्या किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेल्या 188 जणांची यादी सध्या तयार करण्यात आली आहे. त्यातील सर्वाधिक धोका असणाऱ्या 20 जणांची चाचणी करण्यात आली आहे. यातील दोघे हाय रिस्क कॅटेगिरीत असल्याची माहिती आहे.
लक्षणं दिसत असलेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी
मुलाच्या घरापासून तीन किलोमीटर परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लक्षणं दिसत असलेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहेत. त्यातील एक खासगी रुग्णालयामध्ये कार्यरत आहे, तर दुसरा कोझिकोड मेडिकल कॉलेजचा कर्मचारी आहे. निपाहची लक्षणे दिसणाऱ्या सर्वांना कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या ठेवण्यात आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. निपाहमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. या अहवालातून मुलाला निपाहची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे.
केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना
मुलाला सुरुवातीला कोरोना झाला होता. पाच दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान कोरोनाशिवाय आणखी काही गंभीर व्हायरसची लागण झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. सर्व लक्षणं निपाह व्हायरसची दिसत असल्यामुळे तातडीनं तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आले होते. केंद्र सरकारकडून देखील याची पुष्टी झाली असून केंद्राचंही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. निपाह विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशी सर्व मदत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला करण्यात येईल असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.