जयपूर : राजस्थानमधील जयपूर (ग्रामीण) मतदारसंघातून काँग्रेसने आलिम्पिकपटू कृष्णा पुनिया यांना उमेदवारी दिली असून, त्यांचा सामना दुसरे आॅलिम्पिकपटू राज्यवर्धन राठोड यांच्याशी होणार आहे. राज्यवर्धन राठोड हे मोदी सरकारमध्ये क्रीडा राज्यमंत्री आहेत, तर कृष्णा पुनिया या काँग्रेसच्या आमदार आहेत.
राज्यवर्धन यांनी २00४ च्या अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये दुहेरी टॅम्प सूटिंगमध्ये रौप्यपदक मिळवले होते, तर कृष्णा पुनिया २0१२ साली लंडनच्या आॅलिम्पिकमध्ये थाळीफेक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर होत्या. राठोड यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच जागतिक नेमबाजी स्पर्धेत दोनदा सुवर्णपदक पटकावले होते. या मतदारसंघातून राठोड यांचे नाव ठरलेच होते. कृष्णा पुनिया यांच्या नावाची घोषणा मात्र काँग्रेसने सोमवारी रात्री उशिरा केली. नाव जाहीर होईपर्यंत त्यांना आपण निवडणूक लढवणार असल्याचे माहीतच नव्हते. या दोघांनी २0१३ सालीच राजकारणात प्रवेश केला. राठोड भाजपमध्ये गेले, तर पुनिया काँग्रेसमध्ये. त्यांनी २0१३ साली विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्या पराभूत झाल्या. राठोड मात्र २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. पराभूत झालेल्या कृष्णा पुनिया नंतरही काँग्रेसमध्ये सक्रिय राहिल्या आणि त्या नुकत्याच राजस्थानात झालेल्या निवडणुकीत त्या सादुलपूरमधून विजयी झाल्या. (वृत्तसंस्था)मी शेतकऱ्याची मुलगीउमेदवारी जाहीर झाल्यानंतर कृष्णा पुनिया म्हणाल्या की, मी साध्या गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे. मला ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या माहीत आहेत. मी कोणत्याही एअर कंडिशन्ड हॉलमध्ये बसून पदक पटकावलेले नाही. राज्यवर्धन राठोड हे गरीब व शेतकऱ्यांचे नव्हे, तर श्रीमंतांचे प्रतिनिधी आहेत.