बलवंत तक्षकचंडीगड : पंजाबमधील चंडीगड विद्यापीठाच्या विद्यार्थिनींचे स्नान करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने विद्यापीठ आठवडाभरासाठी बंद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, पोलिसांनी शिमला येथील दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, विद्यापीठाच्या दोन वॉर्डनना निलंबित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मोहालीचे पोलीस उपायुक्त अमित तलवार यांच्या समक्ष विद्यापीठ प्रशासनाने आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या. दुसरीकडे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी गुरप्रीत कौर देओ यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली आहे. यात तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये सहा विद्यार्थिनींनी स्नान करत असताना आपले व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्यात आल्याची भीती व्यक्त केली होती. याबाबत विद्यार्थिनींनी विद्यापीठ प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी रात्रीच निदर्शने सुरू केली होती.
मोबाइल-लॅपटॉप जप्त विद्यार्थिनींचे स्नान करतानाचे व्हिडीओ बनवल्याप्रकरणी पोलिसांनी एमबीएच्या एका विद्यार्थिनीला यापूर्वीच अटक केली आहे. तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या मुलीने तिच्या ज्या मित्राला व्हिडीओ पाठवले होते. त्यालाही शिमला येथून अटक करण्यात आली आहे. सोबतच त्याच्या एका मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी आणि पंकज अशी या आरोपींची नावे आहेत.