मेरठ : गेल्या काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, पण आता एक विचित्र घटा समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये धावत्या स्कूटीचे दोन तुकडे झाले. चालकाने कसाबसा स्वतःचा जीव वाचवला. सहा महिन्यांपूर्वीच त्या व्यक्तीने 80 हजारांमध्ये ही स्कूटी खरेदी केली होती. स्कूटीचे दोन तुकडे झाल्यानंतर विमा कंपनीनेही चालकाला क्लेम देण्यास नकार दिला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किशनपुरा येथील धर्मेंद्र यांनी 8 सप्टेंबर 2022 रोजी मेरठमधील बन्सल मोटर्सकडून ही इलेक्ट्रिक स्कूटी पत्नीच्या नावे खरेदी केली होती. अवघ्या सहा महिन्यांतच या स्कूटीचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर त्यांनी शोरुममध्ये जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. शोरुमच्या मालकाने स्कूटी तुटल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मेलद्वारे दिली. यानंतर कंपनीने केवळ चेसिस बदलण्याचे आश्वासन दिले आहे. पण, स्कूटी मालक पूर्ण पैशांची मागणी केली आहे.
याआधी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या अनेक, तसेच गाडी तुटल्याच्या काही मोजक्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणझे, गेल्या काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. सरकारकडूनही यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक कंपन्याही या क्षेत्रात येत आहेत, पण अशाप्रकारच्या घटना ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.