नवी दिल्ली : सक्तीवसुली संचालनालयाने (ईडी) मद्यसम्राट विजय मल्ल्या यांची १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यापूर्वीच त्यांनी शनिवारी आपल्या काही कोटींच्या दोन संपत्तींचीविक्री करून टाकली होती, अशी माहिती मिळाली आहे. लंडनमध्ये असलेले मल्ल्या यांनी आपली संपत्तीची विक्री सुरूकेली असल्याची कुणकुण ईडीला लागल्यामुळेच तातडीने जप्तीची कारवाई करण्यात आली. मल्ल्या यांनी ज्या दोन संपत्ती विकल्या, त्यातील एक कुर्ग आणि दुसरीही त्याच मार्गावर होती. अधिकाऱ्यांनी मात्र या संदर्भात सविस्तर माहिती देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, मल्ल्या यांनी संपत्ती विक्रीचे पैसे घेतले आहेत की, अद्याप त्यांना अथवा विदेशातील त्यांच्या कंपन्यांना हे पैसे मिळायचे आहेत, याचा शोध सध्या ईडीचे अधिकारी घेत आहेत. विक्रीची सविस्तर माहिती ईडीने मिळविली असून, न्यायालयासमक्ष तक्रारीत ती दिली जाणार आहे. बँका अथवा तपास संस्थेच्या हाती लागण्यापूर्वीच मल्ल्या अत्यंत वेगाने आपली संपत्ती विकत असल्याचे ईडीला समजताच शुक्रवारी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला होता आणि न्यायालयाने मल्ल्यांना फरार आरोपी घोषितकेले होते.शनिवारी संचालनालयाने आर्थिक गैरव्यवहार नियंत्रण कायद्यांतर्गत त्यांची संपत्ती जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्तीची कारवाई टाळण्यासाठीच मल्ल्या यांनी संपत्तीची विक्री सुरू केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जप्तीपूर्वीच मल्ल्यांनी विकल्या दोन मालमत्ता
By admin | Published: June 14, 2016 4:29 AM