श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगरच्या बाहेर असलेल्या परिम्पुराच्या खुशीपुरात दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला. यामध्ये दोन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे.पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. गेल्या शनिवारी पाकिस्तानी सैन्यानं राजौरीच्या नौशेरा सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष करण्यासाठी गोळीबार केला. यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर दुसरा जवान गंभीर जखमी झाला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य सातत्यानं नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे.दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा ओलांडता यावी यासाठी पाकिस्तानी सैन्यानं चालू वर्षात आतापर्यंत ४ हजार १३७ पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. गेल्याच आठवड्यात भारतीय लष्करानं चार दहशतवाद्यांचा नगरोटामध्ये खात्मा केला. हे दहशतवादी एका ट्रकमधून लपून जात होते. याची माहिती मिळताच भारतीय लष्करानं धडक कारवाई करत चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यामुळे त्यांनी घातपाताची मोठी योजना आखल्याचं स्पष्ट झालं.