लहान मुलं ही देवाचं रूप असल्याचं म्हटलं जातं. ते जे काही करतात ते अगदी प्रामाणिकपणे करतात. अशी एक हृदयस्पर्शी घटना हिमाचल प्रदेशातून समोर आली आहे. शिमल्यामध्ये दोन मुलींनी आपत्ती निवारण निधीसाठी आपला पॉकेटमनी दान केला आहे. राज्यात आलेल्या आपत्तीनंतर हिमाचल सरकार मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी पैसे जमा करण्यात व्यस्त आहे. या निधीत आतापर्यंत 180 कोटी रुपये जमा झाले आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे, तर त्यांची आई संसार देवी यांनीही मुख्यमंत्री आपत्ती मदत निधीमध्ये 50 हजार रुपयांची रक्कम जमा केली आहे. मात्र, या आपत्तीमुळे राज्यात 8667.95 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ज्याची भरपाई करणे खूप कठीण होईल. मात्र या संकटाच्या काळात दोन शाळकरी मुलींनी मदतीचा हात पुढे केला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रविवार, 24 सप्टेंबर रोजी दोन मुलींनी आपला सर्व पॉकेटमनी राज्याच्या आपत्ती निवारण निधीला दिला आहे. या निष्पाप मुलीने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासमोर आपली पिगी बँक नेली आणि पॉकेटमनी दान केला.
इयत्ता 7वीत शिकणाऱ्या आहाना वर्माने 10,229 रुपये आणि इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी जिया वर्माने 9,806 रुपये आपत्ती मदत निधीसाठी दान केले. मुलांच्या चांगुलपणाचे कौतुक करताना मुख्यमंत्री सक्खू म्हणाले की, मुलीही या चांगल्या कामासाठी देणगी देत आहेत ही आनंदाची बाब आहे. यामुळे आपत्तीग्रस्तांना मदत करून त्यांच्या समस्या सोडविण्यास निश्चितच मदत होईल. या मुलांनी एकतेचा आदर्श घालून दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दोन मुलींच्या अमूल्य योगदानाचे मला कौतुक वाटते. राज्यातील लहान मुलंही आपत्तीग्रस्तांचे दुःख कमी करण्यासाठी हातभार लावून मानवतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत आहेत. या चिमुकल्यांचा हा प्रयत्न संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.