- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ३० वर्षांपूर्वीच्या बोफोर्स घोटाळ्यानंतर भारतीय लष्करास प्रथमच दोन नव्या, अत्याधुनिक हॉवित्झर तोफा मिळाल्या. अमेरिकेच्या बीएई सिस्टिम्सशी केलेल्या करारापैकी १४५-एम-७७७ जातीच्या पहिल्या दोन तोफा गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दिल्लीला पोहोचल्या. आता त्या युद्धभूमी चाचण्यांसाठी राजस्थानात पोखरण येथे नेण्यात येत आहेत. बीएई सिस्टिम्सने उत्पादित केलेली ही तोफ ३० कि. मी. अंतरापर्यंत मारा करू शकते. ही नवी शस्त्रप्रणाली भारतीय लष्कराच्या तोफखाना आधुनिकीकरण कार्यक्रमाशी संलग्न करण्यात आम्ही अमेरिकी सरकारला मदत करणार आहोत, असे बीएई सिस्टिम्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हेलिकॉप्टरद्वारे वाहून नेता येऊ शकणाऱ्या या अल्ट्रा-लाईट तोफा दहा वर्षांपूर्वीच बीएईकडून खरेदी करण्याचे प्रस्तावित होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना घडलेल्या बोफोर्स घोटाळ्यामुळ लष्कराच्या आधुनिकीकरणाचा कार्यक्रम कोलमडला.- या तोफांच्या खरेदीसाठी भारत आणि अमेरिकेने गेल्यावर्षी ३० नोव्हेंबर रोजी जवळपास ५ हजार कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली होती. - या करारानुसार भारत अशा प्रकारच्या एकूण १४५तोफा घेणार आहे. यापैकी पहिल्या २५ तोफा पूर्णपणे तयार स्वरूपात आयात केल्या जातील. बाकीच्या १२० तोफांचे उत्पादन बीएई महिंद्रा या मुद्दाम स्थापन केलेल्या संयुक्त कंपनीतर्फे भारतात केले जाईल. यापैकी बहुतांश तोफा चीनलगतच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.