सुरेश भटेवरा / अमेथी अमेथीची लढाई यंदा लक्षवेधी ठरणार आहे. अमेथीचे राजे, काँग्रेसचे खा. संजयसिंगांची घटस्फोटित पत्नी गरीमासिंग (भाजपा) व आताच्या पत्नी अमितासिंग (काँग्रेस) या दोन राण्या एकमेकांविरुद्ध उभ्या आहेत. दुसरीकडे ‘यूपी को ये साथ पसंद है’ घोषणेसह समाजवादी व काँग्रेसची आघाडी राज्यात एकोप्याने लढत असली तरी अमेथीमध्ये वादग्रस्त मंत्री गायत्री प्रजापती इथे सपाचे उमेदवार आहेत. त्यामुळे ‘ये साथ अमेथीको पसंद नही है’ असे इथे चित्र आहे.नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेथीतील भाजपच्या गरीमा सिंग (६0) म्हणजे दिवंगत पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंगांची भाची. गरीमा सिंगचे पुत्र अनंत विक्रम सिंग आणि कन्या महिमा यांनी स्मृती इराणींच्या मध्यस्थीने २0१६ साली भाजपात प्रवेश केला. आपल्यावर अन्याय झाला. घटस्फोटानंतर काही मिळाले नाही, हे सांगत त्या मते मागतात. उमेदवारी अर्जात मात्र त्यांची मिळकत २२ कोटींची दिसते. इथे ठाकुरांची मतसंख्या मोठी. त्यांंची सहानुभूती मिळवण्यात त्या यशस्वी ठरल्या. संजयसिंग स्वत: अमितासिंगांचा प्रचार सांभाळत आहेत. अमितासिंगांची भेट झाली. प्रचाराने दमल्यानंतरही चेहऱ्यावर उत्साह आणि आत्मविश्वास होता. अमेथी माझे घर आहे. येथील लोकांसाठी मी दिवसरात्र काम केले आहे. विधानसभेवर त्यांनी दोनदा मला निवडून दिले. ते यंदाही मला संधी देतील, असे त्या म्हणाल्या. त्या दादरच्या हिंदु कॉलनीतल्या कुळकर्णी असल्याने बहुतांश संवाद मराठीतूनच झाला. गेल्या वेळी निसट्या मतांनी माझा पराभव झाला. यंदा त्याची भरपाई होईल, असे आत्मविश्वासाने म्हणाल्या. सपाचे गायत्री प्रजापती एक बदनाम व वादग्रस्त आहेत. अलाहाबाद हायकोर्टाने प्रजापतींच्या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे सोपवली. अखिलेशनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतरही, मुलायमसिंग यांच्या दबावामुळे प्रजापतींना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे लागले. मागासवर्गीय मते एकत्र करून गेल्या निवडणुकीत गायत्री यशस्वी झाले. यंदा ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. गायत्री प्रजापतींना अटक होईल, अशीच चर्चा आहे. बसपचे राहुल मौर्य स्थानिक उमेदवार नसल्याने त्यांचा प्रभाव नाही. सहानुभूतीचा फायदा गरीमासिंगना होतो की लोकांसाठी झटणाऱ्या अमितासिंगांना अमेथी संधी देते याचे उत्तर निकालानंतरच मिळेल. कोण आहेत या दोघी?अमेथीच्या राजमहालाच्या एका भागात गरीमासिंग राहतात, तर दुसऱ्या भागात अमितासिंग संजयसिंगांसोबत राहतात. गरीमासिंगांचा राजकारणाशी संबंध नव्हता. च्यापूर्वी त्या घरातूनही बाहेर पडत नसत. आता दोन्ही राण्या एकाच राजमहालातून सकाळी बाहेर पडतात. गरीमासिंगना लोक प्रथमच पाहत आहेत. अमितासिंग मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व २00२ ते २0१२ पर्यंत आमदार होत्या. राजनाथसिंग मंत्रिमंडळात त्या तंत्रशिक्षण मंत्रीही होत्या.
अमेथीत दोन राण्यांची लक्षवेधी लढत
By admin | Published: February 22, 2017 1:09 AM