कौतुकास्पद! चिमुकल्यांना रस्त्यावर सापडल्या हजारो रुपयांच्या नोटा; जमा केल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:47 AM2024-02-27T10:47:00+5:302024-02-27T10:47:49+5:30
दोन निरागस मुलांनी जमिनीवर पडलेल्या हजारो रुपयांच्या नोटा पोलिसांना देऊन प्रामाणिकपणा दाखवल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात इयत्ता तिसरी आणि पाचवीत शिकणाऱ्या दोन निरागस मुलांनी जमिनीवर पडलेल्या हजारो रुपयांच्या नोटा पोलिसांना देऊन प्रामाणिकपणा दाखवल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. शाळा व्यवस्थापनामार्फत 8 हजार 900 रुपये पोलिसांकडे जमा करण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा पाहून एसडीओपीही भारावून गेले. यावेळी पोलीस अधिकाऱ्याने मुलांना बक्षिसे देऊन सन्मानित केलं.
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या बारवाह पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. सरस्वती शिशू मंदिर येथे इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी विशाल आणि इयत्ता तिसरीत शिकणारा यश या दोघांना दुपारी शाळेबाहेरील रस्त्यावर चलनी नोटा पडलेल्या दिसल्या. रस्त्यावर खूप नोटा पडलेल्या पाहून दोन्ही मुलांना सर्वप्रथम धक्काच बसला. मग त्यांनी एक एक करून सर्व नोटा जमा केल्या.
हजारो रुपये घेऊन मुलांनी थेट वर्गशिक्षकाकडे जाऊन रस्त्यात नोटा सापडल्याची माहिती दिली. मुलांना मिळालेल्या पैशाची माहिती शिक्षकाने शाळेचे व्यवस्थापक रामकिशन जैस्वाल यांना दिली.जयस्वाल यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना रकमेसह पोलीस ठाण्यात पाठवलं. पोलीस स्टेशनमध्ये मुलांनी माहिती देताना 8900 रुपयांची ही रक्कम एसडीओपी अर्चना रावत यांच्याकडे सुपूर्द केली. दोन्ही लहान मुलांचा प्रामाणिकपणा पाहून एसडीओपी अर्चना रावत भारावून गेल्या आणि त्यांनी मुलांचा सत्कार केला.
बरवाहच्या एसडीओपी अर्चना रावत म्हणाल्या, मुलं शाळेबाहेर खेळत असताना रस्त्यावर 8900 रुपये सापडले. यामध्ये सर्वाधिक 500 रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचाही समावेश होता. मुलांनी प्रामाणिकपणा दाखवला आहे. त्यांचा गौरवही करण्यात आला आहे. मात्र ही रक्कम घेण्यासाठी कोणीही आलेले नाही. ते जर आले तर ही रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली जाईल.