श्रीनगर, दि. 22- जम्मू-काश्मीरच्या बनिहाल जिल्ह्यात शुक्रवारी स्थानिक पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडलं आहे. बुधवारी (20 सप्टेंबर) या दहशतवाद्यांनी बनिहालमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. त्यानंतर शुक्रवारी रामबन पोलिसांनी दोन जणांना जिवंत पकडले. या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली असून त्यांची नावं आरिफ आणि गजनफर अशी आहेत. या दोघांनी बुधवारी बनिहाल-काझीगड रस्त्यावरील बोगद्याजवळ सशस्त्र सुरक्षा दलाच्या दोन जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एक जवान जखमी झाला होता. यावेळी हल्ला करणाऱ्या त्या दोघांनी जवानांच्या रायफल्सही पळवून नेल्या होत्या.
शुक्रवारी रामबन पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांकडून पळवून नेलेले रायफल्स आणि बनिहालमधील हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल त्यांच्याकडून जप्त केले आहेत. बनिहालमधील हल्ल्याच्या वेळी दोन सर्विस रायफल लष्कराकडून या दहशतवाद्यांनी पळवून नेल्या होत्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
बनिहालमध्ये बुधवारी सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर झाला दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. रामबन जिल्ह्यातील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता तर एक जण जखमी झाला, दरम्यान, सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पच्या परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसंच दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. पोलिसांचा तपास सुरू असताना आज दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश आलं आहे.
शोपियान सेक्टरमध्ये हिजबुल मुजाहिदीनचा एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश काश्मीर खोऱ्यात सुरक्षा रक्षकांनी दहशतवादविरोधी अभियान राबवताना बुधवारी हिजबुल मुजाहिद्दीनच्या आणखी एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. अनंतनाग येथील बीजबहाडा रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतलं. तसेच, पोलिसांनी ओमपोरा येथे एक जिवंत बॉम्ब निकामी करीत एक मोठी दुर्घटना रोखण्यात यश मिळवलं होतं.