इंफाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (मंगळवारी) मणिपूरमध्ये (Manipur) निवडणूक रॅलीला (Election Rally) संबोधित करणार आहेत. मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी आणि 5 मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी मणिपूरमधील कांगपोकपीजवळच्या परिसरातून आयईडीसह (IED) दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीसाठी राज्यात व्हीव्हीआयपी मुव्हमेंट सुरू असताना दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली जात होती. इंफाळ ते कांगपोकपी या मार्गावर व्हीव्हीआयपी ताफ्याला स्फोट घडवण्याचा कट रचला जात होता. दरम्यान, अटक केलेले दोन्ही दहशतवादी नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड नावाच्या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित आहेत. पोलीस पथक या दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी करत असून ते कोणाला टार्गेट करणार होते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
दहशतवाद्यांच्या समर्थकांकडून पोलीस ठाण्यावर हल्लापोलिसांनी या दोघांना पकडून सेकमाई पोलीस ठाण्यात आणले असता रात्री त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि हवेत गोळीबार केला. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये पहिल्या दोन टप्प्यात 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा बदलल्या. आता मणिपूरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी मतदान होणार आहे.