श्रीनगर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरामध्ये शनिवारी (10 ऑक्टोबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला. पम्पोरमधील कांधीजल ब्रिजवर सीआपीएफच्या 110 बटालियनचे जवान आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस रोड ओपनिंग ड्युटी (आरओपी) वर तैनात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले होते.
गेल्या आठवड्यात एलओसीवर पाकचा गोळीबार
पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या आठवड्यात कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले होते, तर अन्य चार जण जखमी झाले होते. या जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले होते.