मुंबई - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. गडोल कोकरनाग परिसरात सुरू असलेल्या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी सुरक्षा दल चांगलेच आक्रमक दिसले. यावेळी ड्रोनद्वारे केलेल्या कोम्बिंगदरम्यान एक दहशतवादी जंगलात पळताना दिसला. तसेच, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे ठिकाण सापडल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, बारामुला जिल्ह्यातही सुरक्षा जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू एन्काऊंटरमध्ये आणखी एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. सकाळपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. त्या डोंगराळ भागात छोट्या नैसर्गिक गुहा असल्याने सैनिकांना कारवाईत वेळ लागत आहे. प्रत्येक गुहेत दहशतवादी लपलेले असू शकतात, त्यामुळे सुरक्षा दल सावधपणे पुढे जात आहे. लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करत असताना, शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कराचा आणखी एक जवान शहीद झाला. त्यामुळे या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे.
अनंतनागमध्येही सैन्याचं मोठं ऑपरेशन
शुक्रवारी केलेल्या ऑपरेशनमध्ये रणनीतीने कोम्बिंग करण्यात आले. कमांड सेंटरही घटनास्थळी आणण्यात आले. यासोबतच हेलिकॉप्टर आणि क्वाडकॉप्टरद्वारेही लक्ष्य निश्चित करण्यात आले. यानंतर स्पेशल फोर्सने बॉम्बफेक करून त्या लक्ष्यांना उद्ध्वस्त केले. गेल्या 3 दिवसात आतापर्यंत सहा गुहा उद्ध्वस्त झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जवानांनी शुक्रवारी आधुनिक शस्त्रांचा वापर केला. यामध्ये UBGL,ग्रेनेड लाँचर आणि आयईडी स्फोट करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.