"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:24 IST2025-03-31T18:23:33+5:302025-03-31T18:24:24+5:30
भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले...

"देशातील दोन तृतीयांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने...", मणिशंकर अय्यर यांचं मोठं विधान
सध्या संपूर्ण देशभरात हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू आहे. यातच, कँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी यासंदर्भात आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सोमवारी मोठे विधान केले. द्वेषाचे राजकारण सुरू असतानाही देशातील दोन तृतियांश लोक हिंदू राष्ट्राच्या बाजूने नाहीत, असे अय्यर यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही, तर भारत एक असा देश आहे, जेथे सर्वांचेच खुल्या मनाने स्वागत होते. आपण एकमेकांशी एकोप्याने राहायला हवे, असेही मणिशंकर अय्यर म्हणाले.
"देशात द्वेष पसरवला जातोय" -
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणाले, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आशियाई देश आणि दुबई, सौदी अरेबिया, ब्रिटन तसेच अमेरिकेसारख्या इतर देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना मी ईदीच्या शुभेच्छा देतो. मी अशा भारतातून बोलत आहे, जेथील भूमी सर्वांचे स्वागत करते. या देशात प्रत्येकाने आनंदाने राहावे, प्रत्येकाने एकमेकांसोबत शांततेने राहावे आणि आपण एकमेकांकडून खूप काही शिकायला हवे. यावर कसल्याही द्वेषाची गरज नाही, देशात द्वेष पसरवला जात आहे. मात्र, असे असूनही, दोन तृतीयांश भारतीयांनी, यात किमान ५० टक्के हिंदूंचा समावेश आहे, कधीही अशा राजकीय शक्तींना पाठिंबा दिला नाही, ज्यांना या देशाला हिंदू राष्ट्र बनवायची इच्छा आहे. हा एक सेक्युलर देश आहे आणि येथे सर्वजण सोबत राहतात.
"राजीव गांधी दोन वेळा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना..." -
काही दिवसांपूर्वी, राजीव गांधी यांच्या पात्रतेसंदर्भात मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "राजीव गांधी एक वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणे तसे कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. अशा व्यक्तीला भारताचे पंतप्रधान कसे काय बनवले गेले," असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला होता.