नवी दिल्ली- देश आणि जगभरातील जवळपास 63 टक्क्यांहून अधिक लोकांना नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी हवे आहे. एका ऑनलाइन सर्व्हेतून हे समोर आलं आहे. या सर्व्हेमध्ये भाग घेणा-या 50 टक्के लोकांनी मोदी दुस-यांदा पंतप्रधान झाल्यास देशाला चांगलं भविष्य लाभेल, असं मत नोंदवलं आहे. न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियानं केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेत देश आणि विदेशातील 54 लाख लोकांनी सहभाग घेतला आहे. सर्वेक्षणानुसार, 63 टक्के लोकांनी मोदींवर 2014च्या तुलनेत जास्त विश्वास दाखवला आहे. तसेच गेल्या चार वर्षांत देशाला सक्षम नेतृत्व दिल्यानं लोकांनी समाधानही व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं या सर्व्हेला फेक म्हटलं आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, लाचार झालेल्या मोदी सरकारनं लोकांचा विश्वास गमावला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीतही भाजपाचा जबरदस्त पराभव होणार आहे. आता पैशाच्या जोरावर काही अयोग्य मार्गाचा वापर करून मोदी सरकार असे फेक सर्व्हे करत आहे. जेणेकरून पुन्हा जनतेची विश्वासार्हता कमावता येईल. अशा सर्व्हेंतून सरकारला समर्थन मिळत नसते.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या लोकांमध्ये मोदींची विश्वासार्हता आजही कायम आहे. तर मिझोरमध्ये कोणत्याही ट्रेंडविना हा सर्व्हे करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार संपवण्याच्या मुद्द्यावर 60 टक्के लोकांनी मोदींवर भरवसा दाखवला आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी मोदींनी देशाचं योग्य पद्धतीनं नेतृत्व केल्याचं 62 टक्के लोकांचं मत आहे. राहुल गांधी यांना 17 टक्के, अरविंद केजरीवाल यांना 8 टक्के, अखिलेश यादव यांना तीन टक्के आणि मायावती यांना दोन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. न्यूज पोर्टल डेली हंट आणि डेटा विश्लेषण करणारी कंपनी नील्सन इंडियानं स्पष्ट केलं आहे की, हा सर्व्हे कोणत्याही राजकीय हेतूनं प्रेरित होऊन केलेला नाही. देशातील जनतेचा आवाज समजावा, यासाठी हा सर्व्हे करण्यात आला आहे.
पुन्हा मोदीच पंतप्रधान हवेत; ६३ टक्के जनतेची इच्छाः सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 11:12 AM