शिवराज सिंह यांच्या कार्यकाळात दोन हजार कोटींचा घोटाळा, कमलनाथ यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 04:24 PM2019-01-30T16:24:11+5:302019-01-30T16:24:57+5:30
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशमध्येशिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या नावाखाली दोन हजार रुपयांचा घोटाला झाल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला आहे. कर्ज घेतले नसतानाही अनेक शेतकऱ्यांची नावे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत आहेत. तसेच अनेक मृत शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज घेण्यात आले आहे, याबाबतच्या अनेक तक्रारी मिळाल्या असून, या प्रकरणी तपास करून भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा कमलनाथ यांनी केली आहे.
या घोटाळ्याबाबत कमलनाथ म्हणाले की, आजसुद्धा दोन तीन शेतकरी मला भेटून गेले. त्यांच्यापैकी कुणीही कर्ज घेतलेले नव्हते. पण या शेतकऱ्यांच्या नावांचा कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत समावेश होता. एवढेच नाही तर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादीतही त्यांचे नाव होते. हा घोटाळा एकूण दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. आम्ही याविरोधात कठोर कारवाई करू''
दरम्यान, कमलनाश यांनी भाजपाच्या गोप्रेमावरही टीका केली. ''स्वत:ला गोरक्षक म्हणवणाऱ्यांचे सरकार गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर होते. पण त्यांना एकाही गोशाळेची निर्मिती करता आली नाही. मात्र आम्ही गोशाळा बांधण्याचे आश्वासन दिले होते. आता आम्ही सत्तेत आल्यावर गोशाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे.'' असे कमलनाथ यांनी सांगितले.