नवी दिल्ली : दोन-तीन दिवसांत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात, महाराष्ट्रातील विनय सहस्रबुद्धे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता जाणकार सूत्रांकडून समजली आहे. फेरबदलात मंत्रिमंडळातून काही मंत्र्यांना वगळले जाईल तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश होईल. नव्या चेहऱ्यांमध्ये सहस्रबुद्धे, अलाहाबादचे श्यामाचरण गुप्ता, जबलपूरचे राकेशसिंग, बीकानेरचे अर्जुनराम मेघवाल, भाजपचे महासचिव ओम माथुर ही ५ नावे चर्चेत तूर्त आघाडीवर आहेत. याखेरीज सर्बानंद सोनोवाल यांच्या रिक्त जागी आसाममधून एका खासदाराची हमखास वर्णी लागेल. उत्तरप्रदेशच्या आगामी निवडणुका लक्षात घेउन अलाहाबादचे गुप्ता व विद्यमान राज्यमंत्री नकवींना कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.सहस्रबुद्धे भाजपच्या थिंक टँकचे महत्त्वाचे घटक आहेत. मोदी सरकारच्या कोअर ग्रुपमधे त्यांच्या समावेशाची शक्यता जाते. महाराष्ट्रात म्हाळगी प्रबोधिनीचे संचालकपद त्यांनी कौशल्याने सांभाळले. राज्यसभेवर निवड झाली, तेव्हापासूनच मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळेल, असा कयास व्यक्त होत होता.नव्या मंत्र्यांच्या शपथविधी १९ ते २३ जूनच्या दरम्यान करण्याचा सरकारचा इरादा होता. तथापि काही कारणांनी फेरबदल पुढे ढकलला गेला. मंत्रिमंडळ फेरबदलाचा तसेच नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीचा निर्णय पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी रा.स्व. संघाच्या नेत्यांशी विचारविनिमय करून घेतल्याचे समजते. पंतप्रधान मोदी ६ जुलै रोजी परदेशी जात आहेत. त्यापूर्वीच फेरबदल करण्याचा सरकारचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले.>कोणाला मिळणार डच्चूमंत्रिमंडळातून ज्यांना बहुदा डच्चू मिळेल, त्यात वादग्रस्त विधाने करणारे बिहारचे गिरीराजसिंग, उपराष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत असलेल्या नजमा हेपतुल्ला, राज्यमंत्री निहालचंद, साध्वी निरंजन ज्योती आदींची नावे आहेत. गिरीराजसिंग यांचा समावेश बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. त्यांना मर्जीनुसार विधाने करण्याची खुली सूटही दिली होती.तथापि त्याचा कोणताही लाभ भाजपला झाला नाही. उलट वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला बॅकफूटवर जावे लागले. नजमा हेपतुल्ला ७१ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ मंत्र्यांना शक्यतो ठेवायचे नाही, असे भाजपाचे धोरण आहे. हेपतुल्लांची जागा रिक्त झाल्यास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवींची कॅबिनेट मंत्रिपदी पदोन्नती होईल.
दोन-तीन दिवसांत केंद्रात शपथविधी!
By admin | Published: June 30, 2016 5:35 AM