नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार सुभ्रांशु रॉय, तुष्क्रांति भट्टाचार्य यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तर सीपीएमचे आमदार विधायर देवेंद्र रॉय सुद्धा भाजपात सामील झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे दोन आणि सीपीएमच्या एका आमदारांने भाजपात प्रवेश केला आहे. तर 50 हून अधिक नगरसेवकांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय दर महिन्याला तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपात सामील होतील. सात टप्प्यात तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतील, हा तर पहिला टप्पा आहे, असे भाजपाचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील मिळालेल्या यशानंतर भाजपाने ममता बॅनर्जींना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने पश्चिम बंगालमध्ये आपली राजकीय खेळी सुरु केली असून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पार्टीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. ममता बनर्जी यांच्या जवळील नेते समजले जाणारे, मुकुल रॉय यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भाजपने सुरु केला आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशात सुद्धा कमलनाथ यांनी आरोप केला आहे की, कॉंग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये येण्यासाठी पैसे आणि मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवले जात आहे. तर, बीएसपीच्या आमदारांना काँग्रेसचा पाठींबा काढण्यासाठी 50-60 कोटीची ऑफर दिली जात असल्याचे ही आरोप होते आहे. त्यामुळे भाजपाने लोकसभा बरोबर देशातील विधानसभा ही मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले असल्याचे दिसून येत आहे.