दोन भाजपला, दोन काँग्रेसला! लोकसभेची सेमीफायनल टाय होणार? पाहा सर्व एक्झिट पोल एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:22 AM2023-12-01T07:22:43+5:302023-12-01T07:24:06+5:30
Exit Polls : लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली - लोकसभेची सेमीफायनल म्हणून लढल्या गेलेल्या पाच राज्यांचा सामना टाय होणार की, निकाल काँग्रेसच्या वा भाजपच्या बाजूने जाणार हे ३ डिसेंबर रोजी ठरणार असले तरी एक्झिट पोलच्या अंदाजात पाच पैकी काँग्रेस-भाजपला दोन-दोन असा विजय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेसला काठावरचे बहुमत मिळेल, तर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजप सत्तेवर येईल असा निष्कर्ष बहुतांश जनमत चाचण्यांतून काढण्यात आला आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) व झोराम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात बहुमत मिळवण्यासाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम या पाच राज्यांसाठीची मतदान प्रक्रिया गुरुवारी संपली. त्यानंतर संध्याकाळी विविध संस्थांनी जनमत चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर केले. मध्य प्रदेशमध्ये सध्या भाजप, तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर आहे. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती हा पक्ष गेली १० वर्षांपासून सत्तेत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सध्या सरकार आहे.