आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यातील कंटाकापल्ली येथे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात दोन ट्रेनमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांनी शनिवारी सांगितले की, या रेल्वे गाड्यांची जेव्हा टक्कर झाली, त्यावेळी एका ट्रेनमधील लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते. अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे अपघातांमागील कारणं अधोरेखित करताना ही माहिती दिली.
२९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता हावडा-चेन्नई मार्गावर रायगडा ट्रेनने विशाखापट्टणम-पलासा ट्रेनला मागून धडक दिली होती. या अपघातामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.
रेल्वेमंत्र्यांनी नव्या सुरक्षा उपायांबाबत माहिती देताना आंध्र प्रदेशमधील या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला. तसेच असे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की, आंध्र प्रदेशमध्ये लोको पायलट आणि सह लोको पायलट यांचं लक्ष क्रिकेट सामन्यामुळे विचलित झाल्याने हा अपघात घडला होता. आता आम्ही अशी व्यवस्था निर्माण करत आहोत, जी अशा परिस्थितीची त्वरित माहिती घेईल. त्यामुळे पायलट आणि सहाय्यक पायलट यांचं संपूर्ण लक्ष ट्रेन चालवण्यावर एकाग्र राहील. ते पुढे म्हणाले की, आम्ही सुरक्षेवर आपलं लक्ष केंद्रित करणं कायम ठेवणार आहोत. आम्ही प्रत्येक घटनेचं मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यावर तोडगा काढतो.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा तपास अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र या घटनेच्या एका दिवसानंतर प्राथमिक रेल्वे तपासामधून या अपघातासाठी रायगडा ट्रेनचा लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट जबाबदार असल्याचे समोर आले. त्यांनी खराब स्वचलित सिग्नल प्रणालीसाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन केलं. या अपघातामध्ये चालक दलाचा दोन्ही सदस्यांचा मृत्यू झाला होता.